मराठवाड्यात पेरण्या रखडल्या, महाराष्ट्रातील वातावरणात मोठे बदल

Foto
पुणे : राज्यात पुन्हा एकदा हवामानात बदल जाणवत असून अनेक भागांत ढगाळ आणि उष्ण वातावरण अनुभवायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत हवामान कोरडे आणि दमट राहण्याचा अंदाज आहे. या भागासाठी कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही. अनेक ठिकाणी समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या असून काही भागांत दुबार पेरणीचे संकटही निर्माण झाले आहे.

पाऊस अचानक कुठे गायब झाला? आणि तो पुन्हा कधी सक्रिय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २१ जुलैनंतर मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी चांगल्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. सध्या मात्र बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे.

कोकण विभागात हवामानात बदल जाणवत असून उष्ण आणि दमट वातावरण आहे. कमाल तापमान सुमारे ३२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण असून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मात्र या विभागासाठी कोणताही हवामान अलर्ट जारी करण्यात आलेला नाही.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि घाटमाथ्यावरील काही भागांत हलक्या पावसाची शक्यता आहे. मात्र बहुतांश ठिकाणी उष्ण आणि कोरडे वातावरण कायम आहे. पाऊस थांबल्यानंतर उन्हाचा चटका वाढल्याने नागरिकांसह शेतकरीही पावसाची प्रतीक्षा करत आहेत.

धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता असली तरी कोणताही विशेष हवामान इशारा जारी करण्यात आलेला नाही. पावसाच्या विश्रांतीमुळे उकाड्यात वाढ झाली असून नागरिकांना उष्णतेचा त्रास जाणवत आहे.

अकोला, अमरावती, बुलढाणा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत पुढील काही दिवस कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे. दोन ते तीन दिवसांनंतर वातावरणात काही प्रमाणात बदल होऊ शकतो, मात्र सध्या या भागासाठीही कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

राज्यात सध्या बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीच्या कामांवर परिणाम होत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार जुलैच्या अखेरीस मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता असली तरी तोपर्यंत शेतकर्‍यांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे आणि त्यानुसार नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.